इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ च्या नव्या प्रमुखांची नावे जाहीर झाली आहेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी अरविंद कुमार तर रॉ च्या प्रमुखपदी सामंत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती गोळा करण्याची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरोवर असते तर बाह्य शत्रूंपासून असलेला धोक्याची पूर्वकल्पना देण्याची महत्वाची जबाबदारी रॉ वर आहे.

भारताला चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचा शेजार लाभला आहे. त्यामुळे रॉ ची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. रॉ च्या ऑपरेशन्सची जबाबदारी सामंत गोयल यांच्यावर होती. त्यांना बढती देऊन आता रॉ चे प्रमुख बनवण्यात आले आहे. ते अनिल धामसाना यांची जागा घेतील.

अरविंद कुमार इंटेलिजन्स ब्युरोमध्ये राजीव जैन यांची जागा घेतील. त्यांना काश्मीर प्रश्नाची चांगली जाण आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी गृहमंत्रालयाने फाईलवर स्वाक्षरी केली असून पंतप्रधान कार्यालयाला ही फाईल पाठवण्यात आली आहे. पीएमओमधी वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली. ३० जूनला दोन्ही अधिकारी पदभार संभाळतील. गोयल आणि कुमार दोघेही १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.