केजरीवाल यांचा इशारा; कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप
दिल्लीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले असून जंगलराज असेच चालू राहीले तर नरेंद्र मोदी यांना शांतपणे झोपू देणार नाही, असा इशाराही दिला आहे.
नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटल्यानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांवर टीका केली. ते म्हणाले की, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर आपण गप्प बसणार नाही. दरम्यान, या बलात्कारांच्या प्रकरणात पोलिसांनी दोन बाल गुन्हेगारांना अटक केली आहे. दिल्लीत जंगल राज सुरू आहे तरी मोदींना त्याचे काही वाटत नाही. त्यांनी एक वर्ष कायदा व सुव्यवस्था आमच्या हातात द्यावी, आपण काही पूर्वीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याप्रमाणे गप्प बसणारे मुख्यमंत्री नाही. दिल्ली पोलिसांचे उत्तरदायित्व ठरवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सरकारचा विचार आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, अशा वक्तव्यांना आपण फार महत्त्व देत नाही कारण त्यात राजकारण असते. दिल्लीत जंगलराज नाही. नायब राज्यपाल जंग यांच्याशी चर्चेत केजरीवाल यांनी हरवलेली मुले, महिलांवरचे अत्याचार याची चार वर्षांतील आकडेवारी दिली. त्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या बोलावली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर रविवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.