आम आदमी पक्ष हा उद्योगांविरोधात नव्हे तर तर देशाला लुटणाऱ्या उद्योजकांविरोधात असल्याचे स्पष्टीकरण आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिले. उद्योगपतींच्या ‘सीआयआय’ या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात केजरीवालांनी त्यांची भूमिका मांडली.
ते पुढे म्हणाले की, व्यापार करणे हे सरकारचे काम नाही. सरकारने राज्य कारभार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. तसेच आपला पक्ष हा भांडवलशाही वा उद्योगपतींविरोधात नाही तर देशाला लुटणाऱ्या भांडवलदारांविरोधात असे केजरीवाल यांनी सांगितले.
४९ दिवसांच्या कार्यकाळात दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विद्युत मंडळातील गैरव्यवहाराबाबत कॅगकडून तपासणी करण्याचे आदेश देऊन मुकेश अंबानी, रिलायन्स उद्योग आणि पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांच्याविरोधात गॅसचे दर निश्चित केल्याच्या आरोपावरून कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.