ब्राझीलमधील सर्वात मोठे शहर असणाऱ्या साओ पावलोमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. येथे करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याचमुळे आता येथील स्थानिक प्रशासनाने मृत्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून पूर्वी पुरण्यात आलेल्या मृतदेहांची हाडं बाहेर काढून त्याच जमीनीमध्ये रुग्णांचे अंत्यस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपूर्वी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींची थडगी उकरुन त्यांच्या हडांचे, सांगाड्यांचे अवशेष डब्ब्यामध्ये साठवून त्याच जमीनीमध्ये नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट प्रेसनं दिलं आहे.

शहरातील दफनविधीशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन वर्ष किंवा त्यापूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींचे सांगडे आणि अवशेष वेगवेगळ्या बँगांमध्ये गोळा करुन त्या बँगा वेगवेगळ्या १२ कंटेरनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये हे कंटेनर देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील दफनभूमींमध्ये पाठवून त्या ठिकाणी अवशेष पुरले जाणार आहेत.

लॅटीन अमेरिकन देश असलेल्या ब्राझीमधील साओ पावलोमध्ये करोनामुळे मागील गुरुवारपर्यंत पाच हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चार दिवासंमध्ये या आकड्यात आणखीन भर पडली आहे. दिवसोंदिवस वाढणाऱ्या मृतांची संख्या लक्षात घेता शहरातील उपलब्ध दफनभूमीमध्येच अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यातच या आठवड्यापासून शहरामधील वेगवेगळ्या सेवा सुरु करण्यास महापौर ब्रुनोकोवास यांनी परवानगी दिल्याने करोनाबाधितांचा आणि संसर्ग झालेल्यांचा आकडा अजून वाढण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. केवळ अमेरिकेमध्ये ब्राझीलपेक्षा अधिक लोकांना करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये अद्याप करोनाचा पीक म्हणजेच उच्चांक गाठलेला नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं असून ऑगस्टमध्ये ब्राझीलमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ब्राझीलमधील साओ पावलोमधील सर्वात मोठी दफनभूमी असणाऱ्या व्हिला फोरमोसामधील कामगारांनीही मागील काही महिन्यांपासून येथे अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं म्हटलं आहे.