उच्च न्यायालयाने शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रोजी आरे येथे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रशासनाने वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिकेद्वारे या प्रकरणाची दखल घेत वृक्षतोड थांबवण्यास सांगितली. मात्र यावेळी सरकारने आवश्यक असणारी सर्व झाडे तोडल्याचे न्यायलयात सांगितले. वृक्षतोड करण्यासाठी प्रशासनाने दाखवलेल्या तात्परतेवरुन अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर आश्चर्य व्यक्त करत या घाईघाईत करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. आरेतील मेट्रो कारशेडबाहेर शेकडो पर्यावरणप्रेमींनी आंदोलनही केले. एकीकडे मुंबईमधील मेट्रोसाठी वृक्षतोड केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच दुसरीकडे दिल्लीमधील मेट्रो उभारतानाही वृक्षतोड करायची की नाही असा प्रश्न समोर उभा राहिला होता. आज ३७७ किलोमीटरचे जाळे असणाऱ्या मेट्रोच्या मार्गातील झाडे तसेच ऐतिहासिक स्मारके वाचवण्यासाठी मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये अनेक बदल करण्यात आल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकाऱ्यांनी दिली आहे. मेट्रोच्या सर्व तीन टप्प्यांसाठी बांधकाम करताना मेट्रोने प्रस्तावित प्रकल्पामध्ये बदल केल्याने १२ हजार ५८० झाडे वाचवण्यात डीएमआरसीला यश आले. डीएमआरसीला दिल्ली मेट्रोसाठी ५६ हजार ३०७ झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल या पद्धतीने प्रस्तावित प्रकल्पामध्ये अनेक बदल करुन मेट्रो प्रशासनाने केवळ ४३ हजार ७२७ झाडे पाडली. म्हणजेच परवानगी देण्यात आलेल्या झाडांपेक्षा १२ हजार ५८० झाडे कमी पाडण्यात आली.

‘एखाद्या प्रकल्पाचा पर्यावरणावर किती परिणाम होतो हे लक्षात घेणे गरजेचे असते. जेव्हा आम्ही दिल्ली मेट्रोचे काम सुरु केले तेव्हा आम्ही मूळ प्रस्तावामध्ये थोडे बदल केले. मार्गात थोडा बदल करुन झाडे वाचणार असतील तर आम्ही तसे बदल केले. मात्र जिथे दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता तिथे आम्हाला झाडे तोडावीच लागली,’ अशी माहिती डीएमआरसीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

झाडे वाचवण्याचा प्रयत्न करण्याबरोबर अनेक ठिकाणी शक्य असेल तिथे डीएमआरसीने झाडे स्थलांतरित केली. आजही अनेक ठिकाणी या झाडांच्या स्थलांतरणाचे काम सुरु आहे. ‘एखादे झाड त्याच्या मूळ स्थानापासून पाच किलोमीटरच्या परिघामध्ये स्थलांतरित केले तरच ते जू शकते. स्थलांतरित झाडे जगण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे हे लक्षात घेऊनच आम्ही सर्व निर्णय घेतले,’ असं डीएमआरसीचे प्रवक्ते अनुज दयाल यांनी स्पष्ट केलं.

दिल्ली मेट्रोसाठी जी झाडे कापण्यात आली त्या प्रत्येक झाडासाठी दहा रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. दिल्ली वनविभागाच्या माध्यमातून ही रोपटी लावण्यात आली. डीएमआरसीच्या माहितीप्रमाणे वनविभागाने ५ लाख ३५ हजार १५० रोपटी लावली. या रोपट्यांची वाढ होत आहे की नाही त्यांची वनविभागाच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे की नाही यावर डीएमआरसी लक्ष ठेवते. वनविभागाने लावलेली रोपटी जगण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे असं डीएमआरसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

झाडांबरोबर दाट लोकवस्ती असणारे परिसर आणि ऐतिहासिक महत्व असणाऱ्या परिसरांमधून मार्गाचे बांधकाम करताना अनेक अडचणी आल्याचे दिल्ली मेट्रो प्रशासनाने सांगितले. पहिल्या टप्प्यामध्ये जमीनीअंतर्गत जाणाऱ्या मेट्रो मार्गावर कारशेड बनवण्यासाठी खैबर पास येथील खडबडीत पृष्ठभागावरील माती काढून तेथे डीएमआरसीमार्फत नव्याने भराव टाकण्यात आला. जमीनीखालून जाणाऱ्या मार्गाचे खोदकाम करतानाही मेट्रो प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागली. जंतर मंतर (२३३ मीटर), अग्रसेन की बावली (१८९ मीटर), खुनी दरवाजा (२४.६ मीटर), दिल्ली गेट (१०० मीटर), फिरोज शाह कोटला (१२१ मीटर), शाही सुनहेरी मशीद (१०३ मीटर) आणि लाल किल्ला (११८ मीटर) या भागांमध्ये विशेष काळजी घेऊन बोगदे खोदण्यात आले. या परिसरांमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंना कोणताही धक्का न लावता हे काम करण्यात आले.

रहिवाशी भागामध्ये खास करुन कैलास कॉलिनीमध्ये काम करताना ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा हा डीएमआरसीच्या मार्गातील प्रमुख अडथळा होता. ‘कुतूबमिनार आणि इतर ऐतिहासिक परिसरामध्ये बांधकाम करताना आम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागली. आम्ही या वास्तूंना कोणतीही हानी होऊ नये म्हणून विशेष पद्धतीने अधिक अचूक खोदकाम केले,’ असं डीएमआरसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

जमीनी खालील मार्ग बांधताना लागलेले पाण्याचेही डीएमआरसीने व्यवस्थापन केले. पहिल्या टप्प्यामध्ये खोदकाम करताना लागलेले पाणी हे उत्तर दिल्लीमधील सर्पाकार तलावासाठी वापरण्यात आले. दिल्ली मेट्रोची एकूण मार्गिका ही ३७७ किलोमीटरची असून त्यावर २७४ स्थानके आहेत.