News Flash

५१ टक्के भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता: जागतिक अहवाल

मागील वर्षी हे प्रमाण ४८ टक्के इतके होते

भारतामध्ये दिवसोंदिवस कुपोषणाची समस्या गंभीर होत चालली असतानाच एका नव्या जागतिक अहवालाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा भारताच्या आरोग्य विषयक धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. भारतामधील १५ ते ४९ वयोगटातील ५१ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे ‘जागतिक पोषण आहार २०१७’ या अहवालातून समोर आले आहे. मागील वर्षी याच अहवालानुसार भारतात रक्ताची कमतरता असणाऱ्या महिलांचे प्रमाण ४८ टक्के होते. यंदा ते तीन टक्क्यांनी वाढून ५१ टक्के झाले आहे.

भारतासह १४० देशांमधील कुपोषणाच्या समस्येवर भाष्य करणारा हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. अभ्यास करण्यात आलेल्या सर्व देशांमधील महिला आणि मुलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अविकसित आणि कुपोषित मुलांचे प्रमाण, माता होण्याच्या काळात महिलांमध्ये दिसून येणारी रक्ताच्या कमतरतेची समस्या आणि अधिक वजन असलेल्या वयोवृद्ध महिला या तीन महत्वाच्या मुद्द्यांचा या सर्वेक्षणात समावेश केला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील ३८ टक्के मुलांची योग्य पद्धतीने वाढ झालेली नाही. पोषक आहाराअभावी मुलांच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम झाल्याचे अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पोषक आहार न मिळाल्याने मुलांची उंची कमी राहण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले.

पाच वर्षांखालील जवळपास २१ टक्के मुलांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचे वजन कमी आहे म्हणजेच त्यांचा बॉडी मास इंडेक्स अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर माता होण्याच्या वयातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे २२ टक्क्यांहून अधिक वयोवृद्ध महिलांचे वजन अधिक असल्याचे आढळून आले.

मागील वर्षी मे महिन्यात जिनेव्हा येथे जागतिक आरोग्य सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या १४० देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. भारतातील महिलांमधील रक्ताची कमतरता असण्याची समस्या, अशक्तपणा (अॅनिमिया), कुपोषण या संदर्भात सरकारी स्तरावर कामे सुरु असली तरी त्यामध्ये अपेक्षित यश मिळाल्याचे चित्र दिसत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

नुकताच ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या वॉशिंग्टनस्थित संस्थेद्वारा ‘जागतिक भूक अहवाल : २०१७’ प्रकाशित झाला. त्यातही ११९ देशांच्या क्रमवारीत भारताची क्रमवारी गेल्या तीन-चार वर्षांत लक्षणीयरित्या घसरली असून, भारत आता १०० व्या स्थानावर विसावला आहे. या यादीमध्ये भारताचे शेजारी असणारे देश भारताहून चांगल्या क्रमावरीवर आहेत. बलाढय़ चीन या क्रमवारीत २९व्या क्रमांकावर आहे तर नेपाळ (७२), म्यानमार (७७), श्रीलंका (८४), बांगलादेश (८८) स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 12:46 pm

Web Title: as per findings of the new global nutrition report 2017 51 of indian women aged 15 49 anaemic
Next Stories
1 भारताशी युद्ध हा पर्याय असू शकत नाही : पाकिस्तानी पंतप्रधान
2 २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास ‘जीएसटी’त बदल करणार : राहुल गांधी
3 Jammu and Kashmir : ‘जैश’ला हादरा, काश्मीरमध्ये मसूद अझहरच्या भाच्याचा चकमकीत खात्मा
Just Now!
X