शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आम्ही ही कारवाई करीत आहोत, असे स्पष्टीकरण सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी यांनी दिले आहे. याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे नष्ट करण्याचा आणि न्यायात अडथळा आणण्याचे काम करीत असल्याचा आरोपही राव यांनी केला आहे.

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी पश्चिम बंगाल सरकारने यासाठी राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची निर्मितीही केली आहे. हेच राजीव कुमार सध्या कोलकाताचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण ताबा घेतला असून सर्व पुरावे आणि सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे आम्हाला देण्यास ते सहकार्य करीत नाहीत. यांपैकी अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही नागेश्वर राव यांनी केला आहे.

शारदा घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम पोहोचली. मात्र, पोलिसांनी त्यांना पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचू दिले नाही. उलट पोलिसांनीच या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आणि सोडून दिले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.