जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेल्या अहवालात भारतासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, जगात मलेरियाचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या ११ देशांपैकी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ भारतात मलेरिया आजाराच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१७ मध्ये भारतात जगातील एकूण मलेरियाची लागण झालेल्या प्रकरणांमध्ये चौथा क्रमांक होता. मात्र, यंदा यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यानुसार, २०१६च्या तुलनेत २४ टक्क्यांनी ही घट झाली आहे. दरम्यान, भारतात मलेरियाच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक घट ओडिशा राज्यात झाली आहे.

मलेरियाच्या प्रमाणात घट होण्यामागे अनेक कारणे असून यामध्ये मलेरियाच्या पुनरुत्थानासाठी राजकीय इच्छाशक्ती, तांत्रिक नेतृत्वाचे सक्षमीकरण, मलेरिया कमी करण्यासाठी नेमका दृष्टीकोन तसेच स्थानिक स्तरावर निधीचा पुरवठा या सगळ्यांचा सहभाग असल्याचेही अहवालात म्हटले आहे. ओडिशातील दुर्गम भागात आरोग्य कार्यकर्ते अर्थात आशा कार्यकर्त्यांनी यासाठी मोठी मेहनत घेतली असून हे कार्यकर्तेच या मलेरिया निर्मुलनाच्या अभियानातील सेनापती आहेत.