पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने आत्तापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आणखी १७ लोकांना अटक केली आहे. तसंच १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्यांची संख्या २५ झाली आहे. पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू २९ जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. आता मृत्यू झालेल्यांची संख्या ८० झाली आहे.

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी अमृतसर येथील तारसिक्का, तांगडा आणि मुच्छल या गावातल्या पाच लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही संख्या २१ वर पोहचली. आज ही संख्या ८० वर पोहचली आहे. तरणतारण या ठिकाणी सर्वाधिक ४२ जणांचा मृत्यू विषारी दारु प्यायल्याने झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.