अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगावर कुणीच माघार न घेतल्याने आज शटडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही काहीच तोडगा निघाला नाही. डेमोक्रॅट व रिपब्लिकन सदस्य त्यांच्या भूमिकांवर हटून बसल्याने अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्यातील अडचणी कायम आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकन सदस्य या आर्थिक पेचप्रसंगात विनाकारण विरोधाची भूमिका घेत असून त्यामुळे १० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ,असा आरोप केला.
दरम्यान आर्थिक पेचप्रसंगाचा पहिला फटका ओबामा यांच्या परदेश दौऱ्यांना बसला असून त्यांनी मलेशिया व फिलिपीन्स या देशांचा पुढील आठवडय़ातील पहिलावहिला दौरा लांबणीवर टाकला आहे. आर्थिक पेचप्रसंगामुळे (शटडाऊन) त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.
मलेशिया व फिलिपीन्स दौरे रद्द
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सांगितले की, ओबामा यांचा आज सकाळी फोन आला होता व त्यांनी अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगामुळे दौरा रद्द करीत असल्याचे सांगितले. हा दौरा नंतर आयोजित केला जाईल, असे ओबामा यांनी सांगितल्याचे नजीब म्हणाले.
वॉशिंग्टन येथे राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या प्रवक्त्या केटलिन हेडेन यांनी सांगितले की, या दोन्ही देशांचे दौरे आर्थिक पेचप्रसंगामुळे शक्य नाहीत. ओबामा यांचे मलेशिया व फिलिपीन्स या दोन्ही देशांचे आगामी दौरे रद्द करण्यात आले आहेत. ओबामा यांच्या ऐवजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे मलेशिया व फिलिपीन्स हे दोन्ही दौरे करणार आहेत.
दरम्यान अमेरिकेत ओबामा केअर या आरोग्य योजनेवरील राजकीय मतभेद कायम असून अमेरिकी काँग्रेसने कर्ज वाढवून देण्याबाबत १७ ऑक्टोबपर्यंत निर्णय घेणे अपेक्षित आहे, अन्यथा दिवसागणिक रोख निधी संपत चालल्याने देणी भागवणे अवघड जाणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज सांगितले की, आरोग्य योजनेबाबतच्या कायद्यावर आपण २०१० मध्ये स्वाक्षरी केली. सर्वोच्च न्यायालयानेही हा कायदा योग्य असल्याचे मत गेल्या वर्षी व्यक्त केले असे असताना रिपब्लिकन सदस्य विनाकारण या योजनेला विरोध करीत आहेत व त्यामुळे आताचा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाल आहे. हा पेच कायम राहिल्यास त्याचे वाईट परिणाम वाढत जाऊन जास्त कुटुंबांना त्याचा फटका बसेल. त्यामुळे अमेरिकी काँग्रेसने अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन शटडाऊनची स्थिती संपवावी. आता कसली वाट पाहू नका व विलंब करू नका, आपली अर्थव्यवस्था व जनता यांना आणखी अडचणीत टाकू नये.
दरम्यान व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, काँग्रेसला सरकारचे कामकाज जे काही प्रमाणात बंद करावे लागले आहे ते सुरू करावे लागणार आहे व लोकांना परत कामावर  घ्यावे लागेल, कुठलीही नाटकबाजी न करता विनाविलंब अर्थसंकल्प मंजूर करावा लागेल. रिपब्लिकन सदस्यांनी मात्र माघार घेण्यास नकार दिला असून त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला नाही. त्यांनी अर्थसंकल्प मंजुरीस नकार दिला आहे. रिपब्लिकन सदस्य परवडण्यासारख्या असलेल्या व मंगळवारपासून अमलात येत असलेल्या आरोग्य सुधारणा कायद्यावर ब्लॅकमेलिंग करीत असून त्यांनी जर संघराज्य सरकारच्या काही विभागांपुरता अर्थपुरवठा करण्यासाठी तात्पुरते काही विधेयक आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध करू.