सध्या जगभरात किकी चॅलेंजची मोठ्या प्रमाणात क्रेझ असून अनेक देशांतील तरुण या चॅलेंजसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या चॅलेंजबाबत नुकतेच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वक्तव्य केले आहे. हे चॅलेंज भयानक आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच या चॅलेंज कोणीही स्वीकारु नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ”अशाप्रकारे नाही ती चॅलेंज स्वीकारण्यापेक्षा आपला जन्म चांगल्या कामासाठी व्यतीत करा. चांगला विचार, चांगले वागणे यातून स्वत:ला सिद्ध करा असे ओवेसी आपल्या भाषणात सांगताना दिसत आहेत. तरुणांनी आपली ऊर्जा अशा कामांत न घालवता समाजात चांगला काही बदल होण्यासाठी वापरावी” असेही ते म्हटले आहेत. ओवेसी यांचा हा व्हिडियो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

किकी चॅलेंज स्वीकारणाऱ्याने चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सगळं करताना गाडीच्या पुढच्या सीटवरील व्यक्ती म्हणजे जी गाडी चालवत असते ती नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करते. जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्कने गायलेल्या इन माय फिलींग्स गाण्यातील पहिल्या कडव्यातील चालीवर हा डान्स केला जातो. या गाण्यातील पहिल्या कडव्यातील बोल किकी डू यू लव्ह मी असे असल्याने या चॅलेंजला कीकी चॅलेंज असे नाव पडले आहे. अनेकांनी #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे झालेले अपघात लक्षात घेऊन जगभरातील अनेक शहरांमध्ये या चॅलेंजवर बंदी घालण्यात आली आहे.