१५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेवरून सरकारकडून वेगवेगळी उत्तर येत आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तर पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांचा पाऊसच पाडला. “चिनी सैन्य भारतीय हद्दीत आलं नाही, असं सरकारकडून सांगितलं जात आहे. तर माझे काही प्रश्न आहेत,” असं म्हणत ओवेसी यांनी सरकारला जाब विचारला आहे.

गलवान खोऱ्यातील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत असं म्हटलं होतं की, चिनी सैन्य भारतीय हद्दीत आलं नाही. कोणत्याही चौकीवर ताबा मिळवला नाही.” मोदी यांनी दिलेल्या माहितीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनीही सरकारच्या भूमिकेनंतर प्रश्न व मुद्दे उपस्थित केले आहेत.

ओवेसी यांनी सरकारला समोर मांडलेले प्रश्न

चिनी सैन्य भारताच्या भूभागात आलं नाही, तर भारताचे २० जवान शहीद कसे झाले?

संसदेच्या मंजुरीशिवाय भारताचा भूभाग कोणलाही भेट देण्याचा अधिकार पंतप्रधानांना नाही.

सेवानिवृत्त एअर मार्शल मनमोहन बहादूर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, गलवान व्हॅली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत येते.

गलवान व्हॅलीत कोणतही काम केलं नसल्याचं सांगत चीननं गलवान व्हॅली त्यांची असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान कार्यालयाचा चीनच्या भूमिकेला पाठिंबा आहे का?

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार असल्याच्या हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा हवाला देत ओवेसी म्हणाले,”जर प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनने आक्रमण केलेले नाही. भारतीय भूभाग ताब्यात घेतला नाही, मग हवाई दल प्रमुखांनी असं विधान का केलं?”

पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून विरूद्ध माहिती दिली जात असल्यानं हे गोंधळात टाकणारं आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखण्यासाठी चिनी सैन्य परत गेलं, असं सांगण्यात आलं. तर दुसरीकडं चिनी सैन्यानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, असं सांगण्यात आलं.

गलवान व्हॅलीतील पेट्रोल पॉईंट १४ जवळ अजूनही चिनी सैन्य तळ ठोकून आहे का, जिथे आपल्या २० वीर जवानांना मारण्यात आलं? हा भूभाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत येतो की, चीनच्या हद्दीत?

पँगाँग त्सो तलाव परिसरातील परिस्थिती काय आहे? इथे भारतीय भूभागात किती प्रदेश येतो?

२० जवानांना मारण्यात आल्याच्या घटनेनंतर गलवान व्हॅली व पँगाँग त्सो इथे नक्की किती भूभाग भारताच्या ताब्यात आहे. त्याचा अधिकृत नकाशा दाखवणार का?

लडाखमधील भूभागातील परिस्थितीविषयी २०१४ पासून ते १६ जून २०२० पर्यंतच्या कालावधीतील श्वेतपत्रिका सरकार काढणार का?