अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करावा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागणीवरुन एका वृत्तवाहिनीमध्ये भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन व एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांच्यात चर्चा सुरू होती. मुंबई मंथन या चर्चासत्रात मुघल परकीय की स्वदेशी यावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी मुघलांना परकीय मानण्यास नकार दिला.

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल बादशाह परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी केला. लाल किल्ला, ताजमहाल बांधणारे मुघल हे भारतीय होते, हिंदू आईच्या पोटी जन्माला आलेले मुघल परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. ओवेसी यांनी भारतामध्ये आरएसएस व भाजपा चुकीचा इतिहास पसरवत असल्याचे सांगत गोळवलकर गुरूजी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांचे दाखले देत ते मुस्लिमविरोधी असल्याचे सांगितले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जर मुघलांपेक्षा तुम्ही चांगले आहेत तर किमान पेट्रोलच्या किंमती तरी कमी करा किंवा ताजमहल तरी बांधा अशी बोचरी टीका ओवेसी यांनी केली. तसंच भाजपा अद्यापही गुलामीच्या काळातून बाहेर आलेला नाही असंही ओवेसी म्हणाले. तर मुघल हे परकीय होते आणि त्यांनी भारतावर हल्ले केले असं शहानवाझ हुसेन म्हणाले. ताजमहल बांधण्यावर मोदी सरकारचा विश्वास नाही, पण हे सरकार देशातील गरिबांसाठी घरं बांधण्याचं काम करत आहे असं उत्तर हुसेन यांनी ओवेसींना दिलं. त्यावर बोलताना, त्याच गरिबांसाठी पेट्रोलच्या किंमती कमी करणार नाहीत का असा प्रतिप्रश्न ओवेसींनी केला.

राम मंदिराबाबत बोलताना हुसेन म्हणाले की, राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याबाबत मला काहीही माहिती नाही. मात्र, मोहन भागवत यांचं देशासाठी वेगळं महत्त्व आहे. राम मंदिराचं प्रकरण न्यायालयात आहे. राम मंदिराचा खटला हा देशाचा सर्वात जुना खटला आहे, याचा लवकरात लवकर निकाल लागावा.