केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपा सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका मुलाखतीत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.”मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. मोदींनी असंवैधानिक लॉकडाउन देशावर लादला. जगभरात लॉकडाउन हटवला जात असताना रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर भारतात उलट परिस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयातही सरकारला खोटं बोलावं लागलं,” अशी टीका ओवेसी यांनी केली.

आणखी वाचा- भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर ओवेसी भडकले; हा असंवैधानिक लॉकडाउन का स्वीकारला?

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज तक वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ओवेसी यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. ओवेसी म्हणाले,”मोदी सरकार प्रत्येक आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. सरकारनं कुणालाही न सांगता असंवैधानिक लॉकडाउन देशावर लादला. लोकांना पैसेही दिले नाही. श्रमिक रेल्वेगाड्यामध्ये दहा दिवसांत ८० लोक कसे मरण पावले? मृत आईजवळ छोट बाळ खेळत आहे, हे जगानं बघितलं. रुग्णांची संख्या वाढत आहे. एक विमान मॉस्कोसाठी सोडलं जातं आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर कळतं वैमानिक पॉझिटिव्ह आहे, हा कसला समन्वय आहे? जेव्हा रुग्णांची संख्या वाढत असताना अर्थव्यवस्था खुली केली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांना देशातील मजुरांची संख्या माहिती नाही,” अशी टीका ओवेसी यांनी केली.

आणखी वाचा- ठाकरे सरकार-रेल्वेमंत्री वादावरून ओवेसींनी काढले पीयूष गोयल यांना चिमटे; म्हणाले …

“देशात करोनामुळे गंभीर स्थिती आहे. दुसरीकडे चीनकडून लडाखमध्ये चीनकडून बांधकाम सुरू आहे. चीनसोबत काय चर्चा सुरू आहे, कुणालाही माहिती नाही. काय चर्चा सुरू आहे, हे मोदी सरकार देशाला का सांगत नाही. ५६ इंच छाती असलेले नेते मोदी देशाशी नाही. ते त्यांचा मूड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगतात आणि ट्रम्प म्हणतात की मोदींचा मूड खराब आहे. सरकारनं सांगायला हवं की ट्रम्प खोटं बोलत आहे. खोटं हा शब्द वाईट असेल, तर सांगावं पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्याशी बोलले नाही, असंही म्हणू शकत होते,” अशा शब्दात ओवेसी यांनी सरकारवर टीका केली.