‘अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटिज प्रिवेन्शन अ‍ॅक्ट’ (UAPA) या कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. UAPAचा वापर केवळ निर्दोष मुस्लीम आणि दलितांविरोधात केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भाजपाचे नेतेमंडळी गोरक्षेच्या नावाखाली झुंडबळी घेणाऱ्यांच्या गळ्यात माळा घालतात, असा आरोपही त्यांनी ट्विट करत केला.

एमआयएमचे नेते असदुद्दीने ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले, “आता हे स्पष्ट झालं आहे की UAPA हा एक कठोर कायदा आहे, ज्याचा वापर निर्दोष मुस्लीम, दलित आणि मागासवर्गातील तरूणांना कैद करण्यासाठी केला जातो. अनेक वर्षांपासून मुस्लीम आणि दलित तरूणांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्यावर कट्टरपंथी असल्याचा आरोप करून त्यांना कलंकित केलं जात आहे!”

“एकीकडे भाजपाचे केंद्रीय मंत्री झुंजबळी घेणाऱ्यांच्या गळ्यात माळा आणि हार घालताना दिसले आहेत. तर दुसरीकडे दहशतवादाच्या संदर्भातील आरोपी असलेले भाजपाचे खासदार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याप्रति आदर व्यक्त करताना दिसले आहेत. अशा गोष्टी आता सवयीच्या होऊ लागल्या आहेत हे पचवणं खूपच जड जात आहे”, असे मत ओवैसी यांनी ट्विटमधून व्यक्त केले.