28 September 2020

News Flash

गुलबर्ग हत्याकांडावेळी मोदींनी काय घातले होते ; ओवेसींचा खोचक सवाल

तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुलबर्ग सामूहिक हत्याकांड झाले होते

Asaduddin Owaisi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर जळजळीत टीकास्त्र सोडले. स्नानगृहात रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला तर डॉक्टरसाहेबांनाच ठाऊक आहे, असे काल मोदींनी मनमोहन सिंग यांना उद्देशून म्हटले होते. याच विधानाचा आधार घेत ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुलबर्ग सोसायटीत सामूहिक हत्याकांड झाले होते, तेव्हा तुम्ही नक्की काय घातले होते, असा बोचरा सवाल ओवेसी यांनी ट्विटवरून विचारला आहे. सन २००२ मधील गुलबर्ग हत्याकांडात एहसान जाफरीसह अन्यजणांची हत्या करण्यात आली होती. ओवेसी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की, जर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाथरूममध्ये आंघोळ करताना रेनकोट घातला असेल तर , मी पंतप्रधान मोदी यांना विचारू इच्छितो की, एहसान जाफरीसह अनेकजणांची हत्या झाली तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी काय घातले होते?. त्यामुळे आता भाजप नेते ओवेसी यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काल मोदींच्या या टीकेनंतर सभागृहातील काँग्रेस सदस्य संतप्त झाले होते. माजी पंतप्रधानांविषयी अशा स्वरुपाचे विधान करणे योग्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. शेवटी काँग्रेस खासदारांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला होता. त्यानंतर आजदेखील या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घालत राज्यसभेचे कामकाज रोखून धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टिप्पणी ही संसद व देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केली. जेव्हा एखादा पंतप्रधान त्यांचे पूर्वसूरी आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीची खिल्ली उडविण्यापर्यंतच्या पातळीला जातो, तेव्हा संसद आणि देशाची प्रतिष्ठा मलिन होते. मोदी स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. संसदेत जो काही प्रकार घडला तो निराशाजनक आणि खरे बोलायचे झाल्यास लज्जास्पद होता, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही पुन्हा एकदा तोंडसुख घेतले. नोटाबंदीमुळे सामान्यांच्या खिशातले पैसे धनाढ्यांच्या खिशात गेल्याचे यावेळी त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:25 pm

Web Title: asaduddin owaisi slams pm narendra modi for raincoat remark questions his role in gulbarg society massacre
Next Stories
1 नोटाबंदीमुळे बेरोजगार झालेल्यांची सरकारकडेच आकडेवारी नाही
2 इंटरसिटी एक्स्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न? अपघात थोडक्यात हुकला
3 मोदींचे विधान संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारे- राहुल गांधी
Just Now!
X