जर एखाद्या आजोबांनी आपल्या नातीबरोबर एक-दीड तास एखाद्या खोलीमध्ये काढला. यावेळी त्यांनी नातीला चार गोष्टी प्रेमाने सांगितल्या तर तो गुन्हा नाही… असे स्वयंघोषित अध्यात्मिक संत आसाराम बापू यांनी जोधपूर पोलिसांना केलेल्या चौकशीवेळी त्यांना सांगितले.
‘आसाराम बापूंवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच चुकले’
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू यांना शनिवारी रात्री जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आणि सोमवारी त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी आसाराम बापूंकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी नातीबरोबर आजोबांनी एक-दीड तास घालवला तर त्यात गुन्हा काय असा प्रश्न उपस्थित केला. संबंधित मुलीला त्या दिवशी संध्याकाळी आपल्या खोलीमध्ये का नेले होते, असा प्रश्न पोलिसांनी आसाराम बापूंना विचारल्यावर ते आपल्या खुर्चीतून उठले आणि पोलिस ठाण्यातील खोलीमध्ये फिरू लागले. आपले डोकं दुखत असल्याची तक्रार करीत त्यांनी पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
आसाराम बापूंची पौरुषत्व चाचणी ‘पॉझिटिव्ह’
जोधपूरमधील आसाराम बापूंच्या आश्रमातील व्यवस्थापक आणि तेथील एक कर्मचारी सध्या फरार आहेत. त्यांना अटक केल्यावर या प्रकरणी आणखी माहिती मिळेल, असे पोलिसांनी म्हटले आहे. आसाराम बापूंचा सहायक शिवा याला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्या दिवशी शिवानेच संबंधित मुलीला आसाराम बापूंच्या खोलीमध्ये नेले होते.