आसाराम बापू खटल्यातील साक्षीदाराच्या मुलाने धाडस दाखवत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढत स्वतःची सुटका करुन घेतली. सोमवारी धीरज विश्वकर्मा या १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते. आसाराम बापूच्या समर्थकांनीच माझ्या मुलाचे अपहरण केले, असा आरोप धीरजचे वडील रामशंकर विश्वकर्मा यांनी केला होता.

कृपाल सिंह यांची १० जुलै २०१५ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कृपाल सिंह हे आसाराम बापूविरोधातील बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार होते. कृपाल सिंह यांच्या हत्या प्रकरणात रामशंकर विश्वकर्मा हे साक्षीदार आहेत.

सोमवारी रामशंकर यांचा १६ वर्षांचा मुलगा घराबाहेर उभा असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. धीरज याचे अपहरण करून त्याला मेरठमध्ये नेण्यात आले होते. बुधवारी धीरज घरी परतला असून घरी परतल्यावर त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘अपहरणकर्ते मला कारमध्ये सोडून काही सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. यादरम्यान मी कारमधून पळ काढला. मी तिथून मेरठ रेल्वे स्टेशन गाठले. मेरठमध्ये रेल्वे पोलिसांच्या मदतीने मी शहाजहानपूरची ट्रेन पकडली आणि घरी परतलो’, असे धीरजने सांगितले.

‘माझ्या मुलाच्या अपहरणामागे आसारामबापू समर्थकांचा हात असू शकतो’, अशी भीती रामशंकर यांनी व्यक्त केली. कृपाल सिंह हत्या प्रकरणात मी साक्ष देऊ नये यासाठीच माझ्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे रामशंकर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, कृपाल सिंह हत्या प्रकरणात ७ जून रोजी रामशंकर न्यायालयात साक्ष देणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांची साक्ष नोंदवून घेता आली नाही. आता २८ जूनला या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्या दिवशीच रामशंकर यांची साक्ष नोंदवून घेतली जाणार आहे. या खून प्रकरणात बलात्कार पीडितेचे वडील व भाऊ हे देखील साक्षीदार आहेत.