गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते. सुरत सत्र न्यायालयाने नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नारायण साईला एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्याच्या चार साथीदारांना प्रत्येकी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण सुमारे ११ वर्षे जुने होते. या प्रकरणात कोर्टात ५३ जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी नारायण साईला अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते. ३० एप्रिल रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार होतं.

त्यानुसार आज न्यायालायने शिक्षा सुनावली असून नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबत एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.