अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम यांचा जोधपूर न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला.  आसाराम यांना जामीन मंजूर केल्यास या प्रकरणाच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आसारामना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१५ ऑगस्ट रोजी आश्रमात शिकणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली ७२ वर्षीय आसारामना  मध्य प्रदेश येथील आश्रमातून अटक करण्यात आली आहे. आसारामनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र जोधपूर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आसाराम यांची जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आसाराम यांच्या वकिलांनी घटनेनंतर इतक्या उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, त्या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरलेली होती. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने माहिती दिली. त्यानंतर तक्रार करण्यात आल्याचे सरकारी वकील आनंद पुरोहित यांनी सांगितले.  आसाराम यांच्या समर्थकांनी हे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावण्याचे तसेच लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी वॉर्डन आणि आश्रमचा व्यवस्थापक अद्याप फरार आहेत. त्यामुळे आसारामना जामीन मंजूर केल्यास या प्रकरणाच्या तपासावर त्याचा परिणाम होईल,असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याची माहिती  दुसरे वकील जगमल चौधरी यांनी पत्रकारांना दिली.
‘मला अटक केली तर त्याची जबर किंमत निवडणुकीत मोजावी लागेल’