स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम याच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालयात आज जाहीर होणार आहे. या महत्त्वपूर्ण निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आसारामला शिक्षा झालीच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी संपूर्ण देशवासीयांचं लक्ष या निकालाकडे लागलं असताना आसारामच्या समर्थकांनी मात्र त्याच्या सुटकेसाठी देवाचा धावा केला आहे. आसारामचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहे.

आसाराम यांच्या भोपाळ येथील आश्रमात समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या आहे. शेकडो समर्थक आसारामच्या आश्रमात जमले असून आरामाच्या तस्बीरीसमोर बसून त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या आहेत. तर वाराणसी, अहमदाबादमध्येही समर्थक जमले असून आसारामच्या सुटकेसाठी तिथेही प्रार्थना सुरू आहेत. काही तासांपूर्वी आसारामसाठी पुष्पमाला घेऊन एक समर्थक कारागृहात पोहोचला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

गृह मंत्रालयाकडून राजस्थान , गुजरात आणि हरियाणा या तिन्ही राज्यांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये आसारामचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे सुरक्षा वाढवण्यास आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. या निकालादरम्यान समर्थकांकडून कोणतीही अप्रिय घटना किंवा हिंसाचार घडू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
आसारामच्या समर्थकांकडून कायदा व सुव्यवस्थेला असलेली भीती लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

जोधपूरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. येथे चोख सुरक्षा व्यवस्था असून जोधपूरचे रुपांतर छावणीत झाल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे जोधपूरमधल्या अनेक ठिकाणी पोलिसांनी आसारामचे समर्थक लपून तर बसले नाहीत ना याचीही खातरजमा पोलिसांनी केली आहे. याआधी आसारामच्या समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईत आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सुरक्षेचे हे उपाय करण्यात आले आहेत.