आसाराम बापूविरुद्धच्या खटल्याचा निकाल

स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याच्याविरुद्धच्या बलात्काराच्या खटल्याचा निकाल देण्याची तयारी जोधपूरमधील विशेष अनुसूचित जाती-जमाती न्यायालयाने केली असल्याने जिल्हा प्रशासनाने पीडित कुटुंबीयांच्या घराभोवतीच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

पीडित कुटुंबीयांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा सातत्याने आढावा घेतला जात असून पाच पोलीस घराजवळ तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अभ्यागतांवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक (शहर) दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित असल्याने आपण सुरक्षेचा वैयक्तिक पातळीवर आढावा घेत आहोत, तसेच अन्य अधिकारी पीडित कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, असेही दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल, असे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे.

जोधपूर न्यायालयातील न्यायमूर्ती मधुसूदन शर्मा यांनी सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद ऐकला असून २५ एप्रिलपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. जोधपूरजवळच्या मानई आश्रमात आसाराम बापूने बलात्कार केल्याचा आरोप एका अल्पवयीन मुलीने केला आहे. आसाराम बापू दोषी ठरल्यास त्यांना किमान १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.