उत्तर प्रदेशातील शाजहाँपूर या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरमध्ये असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या मुलीने केला. ही मुलगी त्यावेळी आश्रमात वास्तव्य करत होती आणि १६ वर्षांची होती. याच प्रकरणाचा निकाल जोधपूर न्यायालय बुधवारी देणार आहे. मात्र या निकालापूर्वीच आसाराम बापू निर्दोष आहे असे वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केले आहे. ईश्वर त्यांना दोषमुक्त करेल असा विश्वास वाटत असल्याचेही तिने म्हटे आहे. तसेच आपण आसाराम बापूसाठी प्रार्थना करणार आहोत असेही साध्वी प्रज्ञाने स्पष्ट केले.

२०१३ पासून बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली आसाराम बापू शिक्षा भोगतो आहे. दिल्लीच्या कमलानगर मार्केट पोलीस स्टेशनमध्ये आसाराम विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर तो जोधपूरमध्ये वर्ग करण्यात आला. आसाराम बापूवर भा.द.वि. कलम ३४२, ३७६, ३५४ अ, जेजे अॅक्ट २३ आणि पोस्को कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. आरोपपत्रात ५८ साक्षीदार सादर करण्यात आले. तर सरकारी वकिलांनी ४४ साक्षीदारांनी जबाब नोंदवला. ११ एप्रिल २०१४ ते २१ एप्रिल २०१४ दरम्यान पीडित मुलीचा १२ पानांचा जबाब नोंदवला. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी आरोपी आसारामचा जबाब नोंदवण्यात आला.