लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी, आपल्याविरुद्धचा खटला चालविण्याच्या प्रकारापासून प्रसारमाध्यमांना रोखण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे याबाबतचा उल्लेख करण्यात आला असता त्यांनी योग्य पद्धतीने याचिका सादर करण्याचे आदेश देऊन त्यावर २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचे मुक्रर केले. सुनावणी स्वत:हून चालविण्याबाबत प्रसारमाध्यमांवर र्निबध घालावेत, अन्यथा याचिकेची सुनावणी योग्य प्रकारे होणार नाही, असे आसाराम बापू यांचे वकील विकास सिंग यांनी नमूद केले.
सुनावणीपूर्वीच प्रसारमाध्यमांतून आपल्यावर खापर फोडले जात असल्याने आपल्याला न्याय मिळणार नाही, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. आसाराम बापू, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे आश्रम यांच्याविषयी तर्क लढविणारे वृत्त देण्यावर र्निबध घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीचे योग्य वृत्तसंकलन करण्यात आल्यास आसाराम बापूंची त्याला कोणतीही हरकत नाही, मात्र बापूंचा आश्रम म्हणजे कुंटणखाना असल्याचा तर्क लढविणारे वृत्त देण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखावे, असेही वकिलांनी म्हटले आहे. आश्रमात जवळपास १० हजार मुले-मुली शिकत असून अशा प्रकारच्या वृत्तामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल, असेही सिंग म्हणाले.
नारायण साई  फरार
आसाराम यांचा मुलगा नारायण साई याच्या शोधासाठी सुरत पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नारायण साई फरार आहे. दोन बहिणींनी आसाराम आणि साई याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आसाराम यांच्या विरोधात चंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरत येथून ती तक्रार वर्ग करण्यात आली आहे. या तक्रार प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्या संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी एक पथक सुरत येथे दाखल झाले आहे.