१६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेले आसाराम बापू यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर शरण होणे टाळले. यासाठी त्यांनी प्रकृती बिघडल्याचे कारण पुढे केले, मात्र यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी जोधपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने जोधपूर पोलिसांनी आसाराम बापू यांच्यावर चौकशीचे समन्स बजावले होते. या आरोपासंबंधी जबानी नोंदविण्यासाठी शुक्रवारी जोधपूर पोलीस ठाण्यात हजर व्हा, असे आदेश बापूंना देण्यात आले होते, मात्र त्यांनी तेथे जाणे टाळले. वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते जोधपूरला जाऊ शकले नाहीत, असे त्यांचा मुलगा नारायण साई यांनी सांगितले. , त्यांची प्रकृती सुधारली की आम्ही त्याची माहिती तुम्हाला देऊ, असे ते पत्रकारांना म्हणाले.
दरम्यान, ही शरणागती टाळल्याने आसाराम यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. शरणागती टाळावी, यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस कारण नाही. चौकशी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आमचे एक पथक मध्य प्रदेशात पाठविण्यात येईल आणि पुढील कारवाई केली जाईल, असे जोधपूरचे पोलीस उपायुक्त अजय लांबा यांनी सांगितले.
याचिका मागे
आसाराम बापूंना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी याचिका त्यांचे वकील सुधीर नानावटी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली होती, मात्र आपण या याचिकेस फारसे अनुकूल नाही, असे सूचक संकेत न्यायमूर्ती ए. जे. देसाई यांनी दिल्यानंतर नानावटी यांनी ही याचिका मागे घेतली.