आसाराम बलात्कार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार महेंद्र चावला यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच इतर साक्षीदारांनाही जीवे मारण्याची धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


महेंद्र चावला म्हणाले, मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आसारामला नक्कीच शिक्षा होईल. मी न्यायव्यवस्थेला प्रार्थना करतो की, अशा प्रकारच्या बालात्काऱ्यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी. महेंद्र चावला हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील सनौली खुर्द या गावचे रहिवासी आहेत. साक्षीदार बनल्यानंतर त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले आहेत. १३ मे २०१५ रोजी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी ३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जस जशी कोर्टात सुनावणी होत गेली त्यांच्या सुरक्षेतही वाढ होत गेली. आता त्यांच्या सुरक्षेसाठी ५ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, महेंद्र चावला यांना सातत्याने धमक्या मिळत आहेत. त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे सीआरपीएफकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आसाराम बापूच्या विरोधात आजवर ४४ साक्षीदारांनी साक्ष दिली होती. यांपैकी ९ साक्षीदारांवर हल्ले झाले आहेत. यांपैकी तीन साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक साक्षीदार अजूनही बेपत्ता आहे.