बलात्काराच्या एका प्रकरणात सध्या कारागृहात असलेला स्वयंघोषित गुरू आसाराम याला येथील सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. ७४ वर्षांच्या आसारामने सहाव्यांदा जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. १६ वर्षे वयाच्या एका शाळकरी मुलीवर लैंगिक हल्ला केल्याच्या आरोपाखाली ऑगस्ट २०१३ मध्ये त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते. आसाराम याचे वय आणि मुलीने उशिरा दाखल केलेली तक्रार यासारखा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य़ मानला नाही, असे मुलीची बाजू मांडणारे वकील पी. सी. सोळंकी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन सांगितले. न्यायालयात आसारामची बाजू भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती. जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी ते सोमवारी न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी सोमवारीच पूर्ण करून त्यावरील आदेश राखून ठेवला होता. आसाराम न्यायालयात हजर नसला, तरी त्याचे समर्थक मोठय़ा संख्येने तेथे हजर होते.