आपल्या भक्तगणांना माया, मोह, स्वार्थापासून दूर राहण्याचे प्रवचन देणाऱ्या आसाराम बापूंनी प्रत्यक्षात दहा हजार कोटी रुपयांहून अधिक माया गोळा केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या आसारामांच्या मालमत्तांची एकत्रित मोजदाद केल्यानंतरही ही बाब निदर्शनास आली आहे.
आसाराम यांचे देशभर आश्रम आहेत. या संदर्भातील कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत आसाराम यांच्या नावाने तब्बल नऊ ते दहा हजार कोटी रुपये किमतीची मालमत्ता असल्याचे निदर्शनास आल्याचे सुरतचे पोलीस आयुक्त राकेशकुमार अस्थाना यांनी गुरुवारी येथे सांगितले. विशेष म्हणजे या दहा हजार कोटी रुपये मालमत्तेत आश्रमांच्या जमिनींच्या किमतीचा समावेश नाही. एकटय़ा गुजरातमध्येच आसाराम यांच्या ४५ मालमत्ता आहेत. त्याविषयीच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून अद्याप काहींची छाननी बाकी असल्याचे अस्थाना म्हणाले. गुजरातव्यतिरिक्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही आसाराम यांच्या मालमत्ता असल्याचे तपासात आढळून आले आहे.