वादग्रस्त स्वामी आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू व त्यांचा सहकारी शिवा या दोघांना सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकारी मनोजकुमार व्यास यांनी या वेळी आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला. आपली प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी कोठडीत डॉक्टरना येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आसाराम यांनी न्यायालयाला केली, मात्र आसाराम यांचे वकील या वेळी उपस्थित नसल्याने न्यायालयाने या विनंतीची दखल घेतली नाही.  आसाराम यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्या अर्जावरील सुनावणीही सोमवारीच असल्याने ते या सुनावणीस उपस्थित नव्हते.