भारतात बदल घडवण्याचे काम वेगात सुरु असून, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतात नवीन कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे तीन दिवसीय आसिआन आणि ईस्ट एशिया शिखर परिषदेला सोमवारपासून सुरुवात झाली असून या परिषदेसाठी नरेंद्र मोदी फिलिपीन्समध्ये आहेत. सोमवारी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि जागतिक प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भेट घेतल्यानंतर मी आनंदित आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नाही. आशियाच्या भविष्यासाठी आणि जगात मानवतावादी दृष्टीकोनातून काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र आले आहेत, असे मोदींनी सांगितले. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले होते. याचा दाखला देत मोदी म्हणाले, भारताप्रती ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला. मी त्यांचा आभारी आहे. अमेरिका आणि जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आसिआन’मधील व्यापार आणि गुंतवणूक परिषदेत संबोधित केले. भारतात गेल्या तीन वर्षांत राबवलेल्या योजना आणि आर्थिक सुधारणांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. भारतातील मोठा वर्ग बँकिंग क्षेत्रापासून वंचित होता. आम्ही या वर्गाला जन धन योजनेच्या माध्यमातून बँकेशी जोडून लाखोंचे आयुष्य बदलले, असा दावा त्यांनी केला.

‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ हे आमचे ध्येय असून, आम्ही गेल्या ३ वर्षांत १,२०० कालबाह्य कायदे निकालात काढले, असेही त्यांनी म्हटले आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असून सर्वसामान्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मनिलातील अनिवासी भारतीयांशीही मोदींनी संवाद साधला.