ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पुत्र आणि संगीत दिग्दर्शक हेमंत भोसले यांचे सोमवारी कर्करोगाच्या दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून हेमंत भोसले कर्करोगाला झुंझ देत होते. अनेक वर्षांपासून ते स्कॉटलंडमध्ये वास्तव्याला होते. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान हेमंत भोसले यांची प्राणज्योत मालवली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्म दिनीच हेमंत भोसले यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एक संगीत दिग्दर्शक म्हणून त्यानी छाप निर्माण केली होती. फिर तेरी याद, सनसनी खेज कोई बात, तेरी मेरी कहानी,आया रंगीला सावन,अब कहाँ जायेंगे हम ही त्यानी संगीत दिलेली गाणी बरीच गाजली. आशा भोसले या सध्या सिंगापुर येथे असून त्या स्कॉटलँडला जाणार आहेत असे आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आशाताईंची कन्या वर्षा भोसले यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हेमंत भोसले यांना एक मुलगी असून ती इंग्लडमध्ये शिकत आहे.