नवी दिल्ली – आयुष्यातील ४५ वर्षे मी दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातली आहेत. यानंतर माझ्यावर अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला आणि तो न्यायालयात सिद्ध झाला, तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका लेखक आशिष नंदी यांनी व्यक्त केली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये नंदी यांनी केलेले एक वक्तव्य वादग्रस्त ठरले होते.
राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास तुम्ही काय करणार, असे विचारल्यावर नंदी म्हणाले, अट्रॉसिटीनुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. जर वयाच्या ७५व्या वर्षी माझ्यावर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयात तो सिद्ध झाला, तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. दलित आणि आदिवासी समाजासाठी मी ४५ वर्षे काम केले असल्यामुळे त्या वक्तव्यावरून होणारा अपमान मी कदापि सहन करणार नाही.
दरम्यान, अद्याप मला कोणतेही समन्स मिळालेले नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाले असल्याची माहिती मला समजली आहे. त्यासंदर्भात मला समन्स मिळाल्यावर मी पुढील उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.