आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता दुसरे मोठे नेते आशीष खेतान यांनीही राजीनामा दिला आहे.आशीष खेतान यांनी २०१४ मध्ये पक्षाकडून लोकसभेची निवडणुक लढवली होती. आशुतोष यांच्याप्रमाणेच आशीष खेतान हे देखील पत्रकारीता सोडून राजकारणात आले होते. अनेक दिवसांपासून खेतान हे पक्षाच्या कामकाजात सहभागी होत नव्हते, आशीष खेतान आणि आशुतोष दोघांनीही १५ ऑगस्टलाच राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. खेतान यांनी राजीनामा का दिला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


सक्रीय राजकारणात मी सहभागी नाहीये, आता माझं संपूर्ण लक्ष हे वकिली क्षेत्राकडे आहे, अशी माहिती स्वतः खेतान यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आम आदमी पक्षाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपमधील माझा प्रवास संस्मरणीय होता. आता हा प्रवास संपुष्टात आला असून वैयक्तिक कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी सांगितले. आशुतोष हे पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात आले. आम आदमी पक्षात सामील होण्यापूर्वी आशुतोष हे ख्यातनाम हिंदी वृत्तवाहिनीत कार्यरत होते.