राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारसमोरील अस्थिरतेचं संकट अजूनही संपलेलं नाही. सध्या न्यायालयात हा वाद असून, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याविषयी बोलताना अशोक गेहलोत यांना संताप अनावर झाला. सचिन पायलट हे मागील सहा महिन्यांपासून भाजपासोबत मिळून कट रचत होते. जेव्हा मी याबद्दल बोलायचो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही,” अशी टीका गेहलोत यांनी केली.

सचिन पायलट यांनी आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी नोटीस मिळाल्यानंतर बंड पुकारलं. त्यानंतर काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे आमदार हॉटेलमध्ये असून, सचिन पायलट यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत भडकले. “ते (सचिन पायलट) भाजपाच्या पाठिंब्यानं मागील सहा महिन्यांपासून कट रचत होते. सरकार पाडण्यासाठी कट शिजत असल्याचं जेव्हा मी सांगत होतो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. कुणाालाही माहिती नव्हतं की इतका निष्पाप चेहरा असलेली व्यक्ती असं करेल. मी इथे भाजीपाला विकायला नाहीये. मी मुख्यमंत्री आहे,” अशा शब्दात गेहलोत यांनी आपला संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- सचिन पायलट यांनी ३५ कोटींची ऑफर दिली होती; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

आणखी वाचा- ‘ते’ आमदार गेहलोत यांच्याविरोधात जाऊ शकतात; भाजपाच्या मित्रपक्षाचा दावा

विधानसभा अध्यक्षांनी १८ आमदारांना बजावलेल्या नोटीसीवर उच्च न्यायालयात सुनावणी आहे. उच्च न्यायालय काय निकाल देते यावर राजस्थानातील राजकीय गणित ठरणार आहेत. उच्च न्यायालयानं आधीच अपात्र करण्याच्या नोटीसीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत या नोटीसीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.