प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांच्यानंतर ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. सध्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असून, जगण्याचा हक्कही हिरावून घेण्यात आला आहे. या साऱ्या स्थितीचा निषेध म्हणून आपण हा पुरस्कार परत करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादरी येथील मुस्लीम धर्मियाला घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून बेभान जमाव दगडांनी ठेचतो. ही माणुसकीची निर्घृण हत्या सहनशीलतेच्या पलीकडची आहे. या देशात जो सत्य बोलतो त्याचा काटा काढला जात आहे. बुद्धिप्रामाण्यवाद जपणे हा गुन्हा ठरत आहे. धारवाड येथे कन्नड लेखक आणि विचारवंत एम. एस. कलबुर्गी यांची त्यांच्या घरात घुसून हत्या केली जाते. याचा अर्थ देशातील कायदा आणि सुव्यवस्था कमालीची ढासळल्याचेच लक्षण आहे. असे वाजपेयी म्हणाले.
अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी याबाबत बाळगलेले मौन धोकादायक आहे. लेखिका नयनतारा सहगल म्हणतात त्याप्रमाणे मोदी केवळ वाचाळ आहेत. देशातील बहुतत्त्ववादाचे कुठल्याही परिस्थितीत रक्षण केले जाईल, अशी भूमिका मोदी यांनी घ्यायला हवी होती.
हिंदी कवी, लेखक असलेल्या वाजपेयी यांनी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांच्या विधानांचा निषेध केला आहे. या सर्वानी आक्षेपार्ह विधाने करून भारताच्या बहुसांस्कृतिकता, बहुधार्मिकतेला बाधा आणली आहे. सांस्कृतिक मंत्री शर्मा यांनी कलाम हे मुस्लीम असूनही राष्ट्रवादी होते असे वक्तव्य केले होते. जर बहुसांस्कृतिकता व बहुधार्मिकता धोक्यात येत असेल तर आमच्यासारखे लेखक केवळ निषेध करू शकतात. तो आम्ही करीत आहोत, असे वाजपेयी यांनी म्हटले आहे.
नयनतारा सहगल या नेहरू भाची असून त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. ‘अनमेकींग इंडिया’ नावाने त्यांनी लिहिलेल्या एका खुल्या पत्रात कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी; तसेच विचारवंत नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या व त्यानंतर दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीचा घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून झालेला खून या घटनांबाबत पंतप्रधान मोदी यांनी बाळगलेल्या मौनाचा निषेध केला आहे. वाजपेयी म्हणाले, की बुद्धिवंत व लेखकांची खुलेआम हत्या होत आहे त्याच्या निषेधार्थ आपण पुरस्कार परत करीत आहोत. साहित्य अकादमीनेही साहित्यिकांची स्वायत्तता जपण्यासाठी पुढाकार घेतला नाही याचे वाईट वाटते असेही वाजपेयी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.