आशिया-पॅसिफिक सुरक्षा शिखर बैठकीच्यावेळी सिंगापूर पोलिसांनी एकाला ठार केले. तो या बैठकीच्या ठिकाणी आला होता व नंतर पळून जात असताना त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या मोटारीत अमली पदार्थ सापडले आहेत. शांग्रिला शिखर परिषदेसाठी भारताचे संरक्षण राज्य मंत्री राव इंदरिजत सिंह, अमेरिकेचे संरक्षण मंत्री अ‍ॅशटन कार्टर यांच्यासह जगातील नेते आले आहेत. पहाटेपूर्वी शांग्रिला हॉटेल नजीक एका व्यक्तीस तपासणी नाक्यावरून पळून जात असताना ठार करण्यात आले, त्यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अर्डमोर पार्क येथील प्रवेशद्वारातच त्यांना अडवण्यात आले होते. तीनही जण सिंगापूरचे नागरिक होते व त्यांच्या मोटारीत स्फोटके, जैविक अस्त्रे सापडलेली नाहीत.
मोटार लाल रंगाची होती, गोळीबारात चालक ठार झाला तो ३४ वर्षे वयाचा होता. गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेल बंद करण्यात आले व कुणालाच प्रवेश देण्यात आला नाही. हॉटेलकडे जाणारे रस्ते रोखण्यात आले. नंतर स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजता प्रवेश खुला करण्यात आला. सिंगापूरचे संरक्षण मंत्री डॉ.नेग एंग हेन यांनी शिखर बैठक दुपारच्या भोजनानंतर बंद केली. २९ मे रोजी ही शिखर बैठक सुरू झाली व त्यात आशिया-पॅसिफिक सुरक्षा व दक्षिण चीन सागरात चीनने केलेला दावा हे मुख्य विषय होते. हेन यांनी सांगितले की, भारत व चीन हे गरीब देश राहिलेले नाहीत, त्यांना शीतयुद्धात वंचित होण्याची वेळही आली नाही. चीन ही जगातील दुसरी अर्थव्यवस्था आहे तर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न शतकात तिप्पट वाढले असून त्याने कॅनडा व रशियाला मागे टाकले आहे. आशिया-पॅसिफिक भागाच्या विकासासाठी नवीन संस्था व धाडसी पुढाकाराची गरज आहे व तीच विकासाची प्रमुख इंजिने असतील असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन संस्थांमध्ये ब्रिक्स बँक, आशियन विकास बँक, आशियन पायाभूत विकास गुंतवणूक बँक यांचा समावेश आहे.