रविवारी भारतीय क्रीडा विश्वासाठी आनंदाचा दिवस होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जकार्तामध्ये सुरु असणाऱ्या एशियाड खेळांमध्ये साजन प्रकाश या भारतीय जलतरणपटूने अविश्वसनीय खेळाचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. जवळपास ३२ वर्षांनंतर साजनच्या निमित्ताने २०० मी बटरफ्लाय स्विमिंग प्रकारात भारताची मोहोर उमटली.
१९८६ मध्ये खजान सिंगनंतर २०० मी बटरफ्लाय प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या साजनने संपूर्ण क्रीडाविश्वाचं आणि क्रीडारसिकांचं मन जिंकलं आहे. अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेल्या आठ स्पर्धकांमध्ये साजनला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली असली तरीही त्याचं एकंदर प्रदर्शन सर्वांचच मन जिंकून गेलं.

मुख्य म्हणजे साजनने अतिशय कठिण प्रसंगात आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं. केरळमध्ये आलेल्या पूरात आपलं कुटुंब अडकल्यामुळे सध्या त्याचं संपूर्ण लक्ष तेथेच लागून राहिलेलं आहे. इडुक्की येथील साजनच्या कुटुंबातील पाच जण सध्याच्या घडीला बेपत्ता असून, त्यांच्याशी अद्यापही कोणताच संपर्क झाला नसल्याचं कळत आहे.

‘तो मला सतत फोन करत होता. त्याच्या आवाजातून अस्वस्थता जाणवत होती. त्याच्या मनावर एक प्रकारचं दडपणच होतं. नाहीतर त्याने एखादं पदक जिंकण्यात यश संपादन केलंच असतं’, अशी माहिती साजनच्या आईने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना दिली.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

एशियाडमध्ये ३२ वर्षांनंतर २०० मी. बटरफ्लाय स्विमिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्वं करणारा साजन त्याच्या आईसोबत पुदुच्चेरी येथे राहतो. त्याचं आजोळ हे इडुक्की येथील चेरुथोनी धरणाजवळच असून, तेथे त्याची आजी, मामा आणि कुटुंबातील आणखी तीन सदस्य राहतात. पण, गुरुवारपासून त्यांच्याशी कोणताच संपर्क झाला नसून ते बेपत्ता झाल्याचं कळत आहे. ज्यावेळी साजनला याविषयी कळताच त्याने आपल्या आईशी संपर्क साधत सर्व प्रकाराविषयीची माहिती घेतली.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

साजनच्या आईने दिलेल्या माहितीनुसार या पूरात त्यांच्या कुटुंबाचं बरंच नुकसान झालं असून, आता तर त्यांच्याशी संपर्कही तुटला आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशीच त्या आशा करत आहेत. दरम्यान, केरळमध्ये ज्या भागांमध्ये पूराचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला होता, त्यातच इडुक्कीचाही समावेश होत असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्या कुटुंबाशी संपर्क झाला नसला तरीही ते जेथे असतील त्या ठिकाणी सुरक्षित असावेत, अशीच प्रार्थना साजनच्या आईने केली आहे.