दक्षिण कोरियाच्या आशियाना एअरलाइन्सच्या ओझेड २१४ या विमानाला झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर १८२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या विमानातून तीन भारतीय प्रवास करीत होते. त्यातील दोघेजण जखमी झाले आहेत. सोलवरून ३०७ प्रवाशांना घेऊन आलेले हे विमान विमानतळावर उतरत असताना विमानाचा मागील भाग फुटला आणि आग लागली. मृतांमध्ये दोन अल्पवयीन चिनी मुलींचा समावेश आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती लगेचच उपलब्ध झालेली नसून अपघातानंतर सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरील विमान सेवा बंद ठेवण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक विमानांना आजूबाजूच्या विमानतळांवर वळवण्यात आले.
दक्षिण कोरियातील भारताचे राजदूत विष्णू प्रकाश यांनी सांगितले की, या विमानातून प्रवास करणाऱ्या तीन भारतीयांपैकी एकाच्या गळ्याजवळील हाड मोडले आहे, तर अन्य एकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. आशियाना एअरलाइन्सकडून भारतीय नागरिकांबाबतची सविस्तर माहिती मिळेल, असा विश्वास प्रकाश यांनी व्यक्त केला.
आश्चर्यकारकरीत्या बचावलो – सिंग
आशियाना एअरलाइन्सच्या विमानाला झालेल्या अपघातातून आपण आश्चर्यकारकरीत्या बचावल्याचे भारतीय प्रवाशांनी सांगितले.
विमानाला झालेला अपघात ही एक भयानक घटना होती. या अपघातापूर्वी विमानाचा पायलट अथवा विमानातील कोणत्याही कर्मचाऱ्याने पूर्वकल्पना दिली नसल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यामुळे या अपघातामुळे आम्ही प्रचंड घाबरल्याचे वेदपाल सिंग या भारतीयाने सांगितले.आपल्या कुटुंबासोबत विमानाच्या मध्यभागी बसलेल्या वेदपाल यांच्या मानेजवळ हाड तुटल्याने दुखापत झाली आहे; तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.