वनविभागाच्या हाती अजून एक धक्कादायक व्हिडीओ लागला आहे ज्यामध्ये गिरच्या जंगलात गुजरातचा अभिमान समजल्या जाणाऱ्या आशियाई सिंहाचा सर्रास बेकायदेशीरपणे शो केला जात असून स्थानिकांकडून छळ केला जात असल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात गिर-सोमनाथ जिल्ह्यातून अशाप्रकारची बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान त्यांच्याकडे हा व्हिडीओ सापडला आहे.

हा व्हिडीओ गिर-सोमनाथ जिल्ह्यातील असून जाखिया गावात सिंहाचे असे बेकायदेशीर शो आयोजित केले जात असतात. अनेक रिसॉर्ट आपल्या गेस्टसाठी हे शो आयोजित करतात. यामधून त्यांना मोठी रक्कमही मिळते. हा व्हिडीओ १९ मे रोजीचा आहे. सातजण ज्यामधील चारजण अहमदाबादचे होते, त्यांना बेकायदेशीरपणे हा शो पाहत असताना रेड हॅण्ड पकडण्यात आलं होतं. बाबरिया रेंजमध्ये हा प्रकार सुरु होता. व्हिडीओतील व्यक्ती सिंहाला चिडवत असतानाही सिंह काहीच प्रतिक्रिया देत नाहीये. यावरुनच हा येथील नेहमीचा प्रकार असल्याचं स्पष्ट होतंय.

व्हिडीओत दोन व्यक्ती सिंहासमोर उभं असल्याचं दिसत आहे. यामधील एका व्यक्तीच्या हातात कोंबडी असून तो सिंहाला चिडवताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे सिंह काही फुटावर असतानाही त्यांना कोणतीही भीती वाटत नाही आहे. यावेळी तिथे गावातीलच एक महिला त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असल्याचंही व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. ‘बघ त्याची कशी लाळ टपकतीये’, असं म्हणत त्यांच्यातील एकजण जोरात हसताना दिसतोय. यावेळी महिला त्याला अजून चिडवू नका नाहीतर हल्ला करेल अशी सूचना करते. यानंतर ते कोंबडीला सिंहाच्या हवाली करतात. त्यानतंर सिंह शांतपणे तेथून निघून जातो. या व्हिडीओमुळे स्थानिक कशाप्रकारे पैज लावून सिंहाचा छळ करतात हे उघड झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.