ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांचे आरोप सहन करणाऱ्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये काँग्रेसचा विशेषत गांधी परिवाराचा समाचार घेतला. अमेरिकेत  ३३ वर्षांपासून तुरुंगवासात असलेल्या आदील शहरयार या आपल्या ‘जिवलग’ मित्राला सोडविण्यासाठी राजीव गांधी यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला भारतातून पळून जाण्यास मदत केल्याचा गौप्यस्फोट करीत स्वराज यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया व राहुल गांधी यांना खडसावले. या आरोपाचे अद्याप एकाही काँग्रेस नेत्याने खंडन केलेले नाही.  माझ्यावर हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यापूर्वी स्वतच्या घराण्याचा इतिहास जाणून घ्या. तेव्हा क्वात्रोचीला मदत करण्यासाठी किती पैसा मिळाला, असा प्रश्न आईला (सोनियांना) विचारा, अशा शब्दात स्वराज यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले.
राजीव गांधी यांनी अँडरसनला पळण्याची संधी कशी दिली याची सविस्तर कहाणीच स्वराज यांनी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देवून कथन केली. विरोधकांच्या प्रचंड गोंधळात स्वराज यांनी स्वतची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.  पती स्वराज कौशल यांचे ललित मोदींशी व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
त्या म्हणाल्या की, पासपोर्ट मिळविण्यासाठी ललित मोदी यांची बाजू मांडणाऱ्या अकरा वकिलांमध्ये माझी मुलगी नवव्या क्रमांकावर होती. तिला त्या कामाचे पैसेही मिळाले नाहीत. ललित मोदींना मदत केल्याने विरोधकांनी स्वराज यांच्यावर सहा आरोप केले होते.ललित मोदी यांचा रद्द करण्यात आलेला पासपोर्ट परत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला होता. त्याविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय देताना तत्कालीन संपुआ सरकारने या प्रकरणी चार वर्षे वेळकाढूपणा केला होता, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.

खरगेंचा प्रश्नांचा भडिमार
ललित मोदी प्रकरणावरून स्थगन प्रस्तावाची मागणी करणारे काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तब्बल तासभर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. स्थगन प्रस्तावावरील चर्चेच्या पूर्वार्धात खरगे यांनी सभागृह दणाणून सोडले. सुषमा स्वराज यांनी विरोधी बाकांवर असताना केलेल्या भाषणांचा संदर्भ देत खरगे यांनी ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाब विचारला.
खरगे म्हणाले की, ललित मोदी यांना व्हिसा दिल्यास आपल्या संबंधांवर परिणाम होतील, असा इशारा तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ब्रिटिश सरकारला दिला होता; मात्र सत्तेत आल्यावर स्वराज यांनी भूमिका बदलली. ललित मोदी यांना व्हिसा दिल्यास आपल्या संबंधांना कोणतीही बाधा येणार नाही, असे वकीलपत्र घेतल्याच्या थाटात स्वराज यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले होते. एवढेच नव्हे तर मानवतेच्या मुद्दय़ावर ललित  यांना मदत करताना त्यांच्यावरील आरोपांची जाणीव करून देऊन मायदेशी येण्याची सूचना का केली नाही?  पत्रव्यवहार स्वराज यांनी केला नाही. मात्र फोन केला होता.

लोकसभेत गोंधळच गोंधळ
लोकसभेत आज प्रचंड गोंधळ होता. स्थगन प्रस्ताव स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेस प्रारंभ केला. तब्बल तासाभरापेक्षाही जास्त वेळ त्यांनी स्वराज यांच्यावर गंभीर आरोप केले. सभागृहात वारंवार गोंधळ होत होता. खरगे म्हणाले की, मानवतेच्या मुद्दय़ांवर मदत करताना स्वराज यांनी ललित मोदींना परदेशातून भारतात परत येण्याची सूचना का केली नाही? याशिवाय ललित मोदींचा जप्त पासपोर्ट परत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सरकार का गेले नाही? प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या खरगे यांनी स्वराज आणि ललित मोदी यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला. खरगे बोलत असताना वारंवार सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप घेतला जात होता. त्यात प्रामुख्याने राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदार पुत्राचे नाव आल्यानंतर भाजप सदस्य अत्यंत आक्रमक झाले. या गदारोळात कुणा एका भाजप सदस्याने काँग्रेस अध्यक्षा ‘सोनिया गांधीका काला पैसा’ अशी टिप्पणी केली. त्यामुळे संतापून स्वत: सोनिया लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर अत्यंत संतप्त मुद्रेत आल्या. त्यामुळे समस्त काँग्रेस खासदारही आसनसमोर एकवटले. या गोंधळात कामकाज तासाभरासाठी तहकूब झाले.

विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांचा सामना करण्याची क्षमता पंतप्रधानांमध्ये नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी सभागृहात अनुपस्थित आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धा काळ्या पैशांचे केंद्र आहे. तर त्याचे माजी आयुक्त ललित मोदी या केंद्राचे प्रतीक! ललित यांना सुषमा स्वराज यांनी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मदत केली, हे जगजाहीर आहे.
राहुल गांधी

माझ्यावर हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यापूर्वी स्वतच्या घराण्याचा इतिहास जाणून घ्या. तेव्हा क्वात्रोचीला मदत करण्यासाठी किती पैसा मिळाला? पासपोर्ट मिळविण्यासाठी ललित मोदी यांची बाजू मांडणाऱ्या अकरा वकिलांमध्ये माझी मुलगी नवव्या क्रमांकावर होती. शारदा चीट फंड प्रकरणी चिदंबरम यांची पत्नी नलिनी यांना एक कोटी रूपये मिळाले होते.
सुषमा स्वराज

खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या हाती डोंगर पोखरून उंदीर आला आहे. २००९ साली आयपीएल क्रिकेट स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत घेताना भारतातील पैसा आरबीआयच्या परवानगीशिवाय परदेशात नेण्यात आला. तेव्हापासून सक्तवसुली संचालनालय (ईडी) संबंधित व्यक्तीचा (ललित मोदी) शोध घेत आहे. त्या वेळी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (ललित मोदींना) ताब्यात घेण्याऐवजी ‘फेमा’अंतर्गत ‘लाइट ब्लू कॉर्नर’ नोटीस पाठवली. तत्कालीन सरकारकडून हा मार्गच चुकीचा निवडण्यात आला. त्यास (ललित मोदींना) वृत्तवाहिन्यांनी पळपुटा ठरविले आहे; न्यायालयाने नाही; आता मात्र ईडीने उच्च न्यायालयात मागणी करून त्यास अजामीनपात्र वॉरंट पाठवले आहे.
 – अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

केंद्रीय परराष्ट्र  मंत्र्याने तोंडी सांगितले म्हणजे निर्णयच असतो.  स्वराज यांनी ही शिफारस का केली? त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातील कुणाही अधिकाऱ्यास यासंबंधी का सांगितले नाही?  ललित मोदींना त्यांना गुपचूप मदत करायची होती. यातूनच स्वराज यांचे ललित यांच्याशी आर्थिक हितसंबंध होते.
– मल्लिकार्जुन खरगे