प्रियंका गांधींना त्यांचं शासकीय निवासस्थान सोडायला लावणं या आदेशामागे मोदी सरकारचं क्षुद्र राजकारण आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सत्तेचा वापर करुन तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो हे यातून हे दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतं आहे असाही आरोप शरद पवार यांनी केला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत जेव्हा संजय राऊत यांनी प्रियंका गांधींना त्यांचं निवासस्थान सोडायला लावलं ही बातमी चर्चेत आहे याबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार?
” सत्ता हातात असली की ती विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्प एकदा डोक्यात गेला की अशा प्रकारच्या गोष्टी होतात. एकतर पंडित जवाहरलाल नेहरुंचं योगदान स्वातंत्र्य चळवळीत होतं हे देश म्हणतो. लोकशाहीच्या मार्गाने देश त्यांनी घडवला. पंडित नेहरु यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं. इंदिरा गांधीचे चिरंजीव राजीव गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिलं. एका कुटुंबात देशासाठी बलिदान देणारे दोन लोक आणि त्या आधीच्या पिढीने सगळं आयुष्य देशासाठी वेचलं. अशा कुटुंबातली मुलगी आज  सोनिया गांधींसोबत येत पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी राजकीय मतभेद असतील तरीही हातात सत्ता आहे म्हणून तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो असं हे धोरण झालं. सत्तेचा वापर तुमच्याविरोधात करु शकतो हे दाखवण्यात काही शहाणपणा नाही. एका माजी पंतप्रधानाच्या मुलीला दिलेलं निवासस्थान तुम्ही काढून घेता, त्यानंतर त्यांच्यावर आता लखनऊमध्ये जाऊन राहण्याची वेळ आली आहे हे सगळं क्षुद्र राजकारण आहे. हे सुसंस्कृत राजकारण नाही.”

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात, शरद पवारांचा आरोप

आणखी वाचा- …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

काय आहे प्रकरण?
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना १ जुलै रोजीच सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्र सरकारने तसं पत्रच प्रियंका गांधी यांना दिलं. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमध्ये सरकारी बंगला देण्यात आला होता. मात्र केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात प्रियंका गांधींना पत्र पाठवलं आणि बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले. यावरुन मोदी सरकारवर काँग्रेसकडून चांगलीच टीकाही झाली.

दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मला या सगळ्यामागे सुसंस्कृत राजकारण दिसत नाही हे क्षुद्र राजकारण मोदी सरकारने केलं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.