सीरियातील रशियन सैन्याचा पाठिंबा असलेल्या सुरक्षा दलांनी पामिरा हे प्राचीन वारसा असलेले शहर आयसिसच्या ताब्यातून हिसकावले आहे. जिहादींविरोधात हा मोठा विजय मानला जात आहे.
लष्करी दलांनी आता पामिरातील प्राचीन अवशेषांच्या ठिकाणी लावलेले सुरुंग काढण्यास सुरुवात केली आहे. युनेस्कोने जागतिक वारसा ठिकाण म्हणून आधीच या ठिकाणाची घोषणा केलेली आहे. तेथील प्राचीन स्मारकांची तोडफोड आयसिसने केली असून, त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच टीका झाली होती.
पामिराचा ताबा घेण्यासाठी काल रात्री जोरदार धुमश्चक्री झाली व त्यात आयसिसला काढता पाय घ्यावा लागला असे लष्करी सूत्रांनी सांगितले. आयसिसच्या योद्धय़ांनी माघार घेतली असून, ते आता पूर्वेकडील सुकनाह व डेर इझॉर भागाकडे चालले आहेत. आयसिसने मे २०१५ मध्ये या शहरात विध्वंस करीत ते ताब्यात घेतले होते. तेथील दोन मंदिरे तोडण्यात आली होती. विजय कमान व इतर स्मारकांची तोडफोड केली होती, ही कृत्ये युनेस्को वारसा नियमानुसार गुन्हा मानली जातात व त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात शिक्षा होऊ शकते. जिहादींनी पालमायरा येथे प्राचीन अ‍ॅम्फी थिएटर पाडले व तेथे जाहीरपणे लोकांना फाशी देण्यास सुरुवात केली होती. प्राचीन कला वस्तुसंग्रहालयाच्या ८२ वर्षांच्या माजी प्रमुखाचा शिरच्छेद करण्यात आला होता. पामिरा शहर ताब्यात घेणे हा अध्यक्ष बशर अल असाद यांच्यासाठी मोठा विजय मानला जात आहे. हे शहर ताब्यात आल्याने इराकी सीमेनजीकच्या भागात सैन्यदलांचा वचक वाढणार आहे.