आसाम विधानसभा निवडणुकीसाठीच्या ‘दृष्टिपत्रात’ भाजपचे आश्वासन
आसाममध्ये सत्तेवर आल्यास बेकायदेशीर घुसखोरी थांबवण्यासाठी बांगलादेशसोबतची संपूर्ण सीमा सील करण्याचे, तसेच घुसखोरांना नोकरी देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन भाजपने जाहीर केलेल्या दृष्टिपत्रात (व्हिजन डॉक्युमेंट) दिले आहे. आसाममधील लोकांना बदल हवा असल्याचे सांगतानाच, राज्यात एकतर्फी विजय मिळवण्याचा आशावादही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
‘आसाम व्हिजन डॉक्युमेंट २०१६-२०१५ : सब का साथ, सब का विकास’ या नावाचे दृष्टिपत्र जारी करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर घुसखोरीला मोकळीक देऊन राज्यातील लोकसंख्येची रचना (डेमोग्राफी) बदलत असल्याचा आरोप केला. आसाममध्ये ४ व ११ एप्रिलला दोन टप्प्यांत मतदान होत आहे.
घुसखोरांना कामावर ठेवणारे उद्योग, व्यवसाय आणि इतर संस्थांविरुद्ध कडक कारवाईची तरतूद असलेला कायदा करण्यात येईल, असे दृष्टिपत्रात म्हटले आहे. वने, धार्मिक संस्था, पडीक जमीन व आदिवासी पट्टय़ांमधील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे आश्वासनही यात देण्यात आले आहे.
ही निवडणूक म्हणजे अपयशी ठरलेल्या १५ वर्षांच्या काँग्रेस सरकारला निपटून काढण्याची ऐतिहासिक संधी आहे. त्यामुळेच काँग्रेसविरोधी सर्व पक्ष एकत्र येऊन लढा देत आहेत. आसामात भाजपच्या नेतृत्वातील आघाडी केवळ जिंकणारच नाही, तर एकतर्फी विजय मिळवील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात राज्य कधीही सुरक्षित राहिले नाही, असा आरोप करून बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी आमच्या पक्षाचे सरकार पावले उचलेल, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसागर व सोनारी येथील प्रचारसभांमध्ये सांगितले. भ्रष्टाचारमुक्त सरकारला भाजपचे प्राधान्य असल्याचेही ते
म्हणाले.
आसामची सीमा हा बांगलादेशातील लाखो घुसखोरांना भारतात शिरून आसामी युवकांचा रोजगार हिसकावून घेण्याचा मार्ग झालेला आहे असे सांगून, राज्यात एनडीए सरकार स्थापन करण्यास मदत करा आणि घुसखोरी ‘१०० टक्के’ थांबवा, असे आवाहन शाह यांनी केले.