गुवाहाटी, नवी दिल्ली : आसाम मंत्रिमंडळातील मंत्री हिमंत विश्व सरमा सरमा यांच्यावर प्रचारबंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने (ईसी) त्यांचे भाऊ आणि गोलपाराचे पोलीस अधीक्षक सुशान्त  विश्व सरमा यांची जिल्ह्य़ातून बदली केली आहे.

सुशान्त सरमा यांची राज्याच्या मुख्यालयात योग्य पदावर बदली करावी आणि गोलपाराचे पोलीस अधीक्षक म्हणून व्हीव्ही राकेश रेड्डी यांची त्वरित नियुक्ती करावी, असे निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करण्यात आल्याबद्दलचा अहवाल आयोगाकडे तातडीने पाठविण्यात यावा, असेही निवडणूक आयोगाचे अवर सचिव लव कुश यादव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

बंदी मुदतीत घट 

आसामचे मंत्री आणि भाजप नेते हिमंत विश्व सरमा यांच्यावर निवडणूक आयोगाने ४८ तासांसाठी प्रचारबंदी केली होती त्यामध्ये निवडणूक आयोगाने २४ तासांनी कपात केली. सरमा यांनी बिनशर्त माफी मागितल्याने आणि आचारसंहितेतील तरतुदींचे पालन करण्याचे आश्वासन दिल्याने बंदीच्या मुदतीत कपात करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शुक्रवारी त्यांच्यावर प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली होती आणि त्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत होती. मात्र त्यामध्ये कपात करण्यात आल्याने शनिवारी सायंकाळपासून त्यांना प्रचार करण्याची मुभा मिळाली आहे.