पैसे घेऊन नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजपा खासदार आर पी शर्मा यांची मुलगी पल्लवी शर्मा समवेत आसाम सरकारच्या १९ अधिकाऱ्यांना बुधवारी अटक करण्यात आली. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आसाम लोकसेवा आयोगाच्या (एपीएससी) परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत त्यांचे हस्ताक्षर जुळत नसल्याने या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

एपीएससीमध्ये पैशांच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या दिब्रूगड पोलिसांनी आसाम नागरी सेवा (एसीएस), आसाम पोलीस सेवा (एपीएस) आणि सहाय्यक सेवा २०१६ बॅचच्या १९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या उत्तर पत्रिकेच्या फॉरेन्सिक चाचणी गडबड आढळून आल्यानंतर त्यांना हस्ताक्षर चाचणीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

दिब्रूगडचे पोलीस अधीक्षक गौतम बोरा म्हणाले की, १९ अधिकाऱ्यांचे हस्ताक्षर त्यांच्या उत्तरपत्रिकेशी जुळले नाही. फॉरेन्सिक चाचणीत ती बनावट निघाली. या अधिकाऱ्यांना गुवाहाटी येथून अटक करण्यात आली. राकेश पाल एपीएससीचे अध्यक्ष होते. त्यावेळी आयोजित परीक्षेत या १९ अधिकाऱ्यांची निवड झाली होती. पाल आणि आयोगाच्या इतर ३ अधिकाऱ्यांनी ‘कॅशच्या बदल्यात नोकरी’ देण्याप्रकरणी २०१६ मध्ये अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये १३ एसीएस, ३ एपीएस आणि ३ सहाय्यक सेवांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास अधिकारी सुरजित सिंह पनेश्वर म्हणाले की, तेजपूरचे भाजपा खासदार आर पी शर्मा यांची मुलगी पल्लवी शर्मा या आसाम पोलीस दलात अधिकारी आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी पाल, एपीएससी सदस्य समेदूर रहमान आणि वसंतकुमार डोळे आणि सहाय्यक परीक्ष नियंतत्रक केबराता समवेत ३५ लोकांना अटक करण्यात आली होती.

आसाममधील भाजपा सरकारने पैशाच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सोनोवाल सरकारचे भ्रष्टाचारविरोधातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे अभियान आहे. हा घोटाळा तत्कालीन मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्या कार्यकाळात झाला होता.