गुवाहाटी : नागरिकत्व कायदा मुद्दय़ावर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी कायद्यास विरोध असलेल्या नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. आपले सरकार लोकांच्या भल्यासाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आसाममधील मूळ निवासी लोकांच्या हक्कांना धक्का लावू दिला जाणार नाही, असे सांगून त्यांनी बांगलादेशातून कुणीही सुधारित कायद्याचा आधार घेऊन आसाममध्ये येणार नाही असा निर्वाळा दिला. आसाम हा आसामी लोकांचाच राहणार असून बांगलादेशातून कुणालाही येथे येऊन नागरिकत्व घेता येणार नाही, जे बांगलादेशी गेली अनेक दशके आपल्याबरोबर राहत आहेत, त्यांना अर्ज केल्यानतंर भारतीय नागरिकत्व दिले जाईल. या अर्जदारांचे प्रमाणही फार किरकोळ असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर यादी जाहीर केली जाणार असून त्या वेळी लोकांना नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या लोकांची संख्या खूप नगण्य आहे हे समजून येईल, असे सांगून ते म्हणाले की, तुमच्या हितासाठी मीच याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो, मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही तर तुमच्यातलाच आहे.

सोनोवाल यांनी २००० मध्ये आयएमडीटी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागतिल्यानंतर तो कायदा घटनाबाह्य़ ठरवण्यात आला होता. आसामी भाषेचे राज्याची भाषा म्हणून रक्षण करण्यात येईल. लोकांचे हक्क सुरक्षित राहतील, कुणीही तुमची जमीन, सन्मान व राजकीय हक्क हिरावून घेणार नाही असे त्यांनी सांगितले.