आसाम राज्यात सध्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पुरात काही जण मरण पावले असून ४.२३ लाख लोक बाधित झाले आहेत. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला असून तेथील वन्यजीव आसऱ्यासाठी रस्त्यांवर आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून वन्यजीवांची काळजी घेण्याचे आवाहन टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने केले आहे.

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर रोहितने चिंता व्यक्त केली. या पुरामुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांनी त्यांचे हक्काचे घर गमावले आहे. त्यामुळे ते सध्या आसऱ्यासाठी रस्त्यावर आलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांनी वाहने चालवताना वन्यजीवांचा विचार करावा आणि वाहने सावकाश व जपून चालवावी असे आवाहन त्याने केले आहे.

दोन दिवसांपूर्वी धावपटू हिमा दास हिने सामाजिक भान राखत तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. याशिवाय हिमाने इतर नागरिकांना देखील आसाम पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ‘आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ३३ पैकी ३० जिल्हे पुरामुळे बाधित आहेत. त्यामुळे मी कार्पोरेट कंपन्या, मोठे उद्योजक आणि सामान्य नागरिकांना विनंती करते की त्यांनी आसाम पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात द्यावा’, असे तिने ट्विट केले आहे.

कौतुकास्पद… हिमा दासने आसाम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला पगार

आसाममध्ये पुराचे पाणी लोहमार्गात शिरल्याने रेल्वे प्रशासनाला लमडिंग-बादरपूर मार्गावरील सेवा नियंत्रित ठेवणे भाग पडले आहे. धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्हे बाधित झाल्याचे आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.

पुराचा सर्वाधिक तडाखा बारपेटाला बसला असून ८५ हजार जण बाधित झाले आहेत. जवळपास ४१ महसूल परिमंडळातील ८०० गावे पाण्याखाली असून दोन हजार बाधितांना ५३ मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहेत. तसेच आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला असून वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी तेथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाला उपाययोजना आखावी लागली आहे, तर गोलघाट प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.