आसाममध्ये हातभट्टीतील विषारी दारुचे सेवन केल्याने ८० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून देवेन बोरा आणि इंद्रोकल्प बोरा अशी या आरोपींची नावे आहे. या घटनेत मृत्यू झालेले सर्व जण हे चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार होते.

गुवाहाटीजवळील गोलाघाट येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी गुरुवारी रात्री सालमोरा टी इस्टेट येथील देशी दारुच्या दुकानातूृन दारु विकत घेतली होती. विषारी दारुचे सेवन केल्याने काही वेळाने सर्वांची प्रकृती खालावली. यात गोलाघाट येथील सलमारा आणि जोरहाटमधील बोरघोला आणि तिताबोर येथील कामगारांचा समावेश आहे. जोरहाट रुग्णालयात ४५ जणांचा मृत्यू झाला असून २२१ जणांवर उपचार सुरु आहेत. तर गोलाघाट येथील सरकारी रुग्णालयात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात ९३ जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची दखल आसाम सरकारनेही घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला. ‘आसाममधील गोलाघाट येथील कामगारांच्या मृत्यूमुळे मला दु: ख झाले आहे. अशा कठीण प्रसंगात मी त्यांच्या मी कुटुंबीयासोबत आहे. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मी करतो’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.