आसाममधील कर्करोग रुग्णालयातील पुरुष कर्मचाऱ्याने तीन महिला रुग्णांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी कमल कांतीसेन चौधरीला (वय 26) अटक केली आहे.

त्रिपुरा येथील रहिवासी असलेला कमल हा गुवाहाटीमधील बी बरुआह कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (बीबीसीआय) कामाला होता. कमलविरोधात महिला वॉर्डमधील महिला रुग्णांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत या प्रकरणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तीन महिला रुग्णांनी कमलने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. यानुसार पोलिसांनी कमलविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. 31 डिसेंबरला त्याने महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी कमल चौधरीला रविवारी त्रिपुरामधून अटक केली आहे. बलात्कार, विनयभंग आणि धमकावणे या कलमाअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बीबीसीआय’ हे आसाममधील कर्करोगावर उपचार करणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. 1973 मध्ये हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. या रुग्णालयात 230 बेड आहेत.