आसाम विधानसभेतील भाषण फेसबुकवर लाइव्ह दाखवणे एका आमदाराला महागात पडले आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षातील आमदार अमिनूल इस्लाम यांना विधानसभा अध्यक्षांनी तीन दिवसांसाठी निलंबित केले आहे.

आसाममध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरु असून शुक्रवारी कामकाजादरम्यान अमिनूल इस्लाम यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. आसाममध्ये प्ररप्रांतातून येणा-या लोंढ्यांविषयी ही चर्चा होती. या चर्चेमधील भाषणाचे इस्लाम यांनी फेसबुक लाईव्हवरुन प्रक्षेपण केले होते. यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. विधीमंडळाच्या शिस्तपालन समितीने विधानसभा अध्यक्षांना अहवाल दिला होता. यात इस्लाम यांना ३ दिवसांसाठी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली होती. सोमवारी कामकाज सुरु होताच विधानसभा अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी अमिनूल इस्लाम यांना ३ दिवसांसाठी निलंबित करत असल्याचे जाहीर केले.

विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताच अमिनूल इस्लाम सभागृहातून बाहेर पडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्लाम म्हणाले, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मला मान्य आहे. माझ्याकडून चूक झाली. पण विधानसभेतील कामकाज जनतेला कळावे यासाठी त्याने लाइव्ह प्रक्षेपण करावे अशी मागणी त्यांनी केली. अमिनूल इस्लाम यांनी विधानसभा अध्यक्षांकडे लेखी स्वरुपातही माफी मागितल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लाम हे ज्येष्ठ सदस्य असून त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही असे विधानसभा अध्यक्ष गोस्वामी यांनी सांगितले.